कुटुंबीयांचा पाठिंबा हीच यशाची गुरुकिल्ली : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे

कुटुंबीयांचा पाठिंबा हीच यशाची गुरुकिल्ली : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे
Published on
Updated on

कुटुंबीयांचा पाठिंबा हीच यशाची गुरुकिल्ली पुणे : पुढारी वृत्तसेवा : यश-अपयश, पुन्हा यश, पुन्हा अपयश असे आयुष्यात खूप चढ-उतार अनुभवले, परंतु कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा आणि आनंदाने भरभरून जगण्याची इच्छा, आलेल्या अपयशालाही आनंदाने सामोरे जाण्यची वृत्ती तसेच स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जायचे, हेच ध्येय उराशी बाळगून जीवनात वाटचाल करीत राहिलो, हीच माझ्या आयुष्यातील यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केली. लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे अत्यंत आवडते अभिनेते होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे यांना रिक्रिएट करायची खूप इच्छा असून त्याद़ृष्टीने कामकाज सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भावार्थ आणि संवाद पुणेतर्फे आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवाचा गुरुवारी (दि. 25) समारोप झाला. या कार्यक्रमात मेहता पब्लिशिंग हाऊस आणि स्टोरी टेलतर्फे 'डॅम इट आणि बरंच काही'अंतर्गत महेश कोठारे आणि लेखक मंदार जोशी यांची मुलाखत रंगली, त्या वेळी कोठारे बोलत होते. प्रसाद मिरासदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संवाद पुणेचे सुनील महाजन, नीलिमा कोठारे, मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता आदी उपस्थित होते. यश कसे पचवावे हे अपयश शिकविते, असे सांगून महेश कोठारे यांनी वडील म्हणत असत की, अपयश नव्हे तर किरकोळ ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे, याची कायम आठवण ठेवली. दोन हशांमध्ये जास्त अंतर नको हा दादा कोंडके यांनी दिलेला गुरुमंत्र आपण आत्मसात केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

माझे चित्रपट लहान मुलांनीच हिट केले. 'तात्या विंचू' हे आयकॉनिक कॅरेक्टर चित्रपटात वापरावे यामागे मराठी सिनेमा तांत्रिकबाबतीत समृद्ध करावा अशी मनीषा होती. दिलीप प्रभावळकर हे माझे आवडते अभिनेते असून ते प्रत्येक भूमिका वठविताना अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवत अभिनय करतात, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गाजलेल्या चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण शीर्षके, पालकांनी केलेले संस्कार, यश-अपयशाची आंदोलने, अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करताना केलेले अविरत प्रयत्न, मराठी चित्रपटाला दाखविलेली वेगळी वाट अशा अनेक विषयांवर कोठारे यांनी भाष्य केले.

'इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांनी मराठी चित्रपट बघावेत'

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्त्वाचे आहे. कारण, चित्रपट बघून मुले खूप शिकतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्‍या मुलांनीदेखील मराठी चित्रपट बघितले पाहिजेत, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी गुरुवारी केले. माझे बहुतेक चित्रपट ज्येष्ठांसह लहान मुलांनीदेखील बघितले, याचा मला आनंद वाटतो. बालचित्रपटातील विषय व मांडणी महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ कवी आणि वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते कोठारे यांचा बालकलाकार ते अभिनेता अशा उल्लेखनीय प्रवासाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सिटी प्राईड कोथरूडचे संचालक अरविंद चाफळकर आणि प्रकाश चाफळकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजूशेठ कावरे, प्रसाद मिरासदार, विशाल शिंदे, अखिल मेहता उपस्थित होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. केतकी महाजन-बोरकर यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news