

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पानशेत रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत स्विट होम, मटन शॉप व हॉटेल, अशी तीन दुकाने खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. महापालिका व पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या प्रकरणी हवेली पोलिस तपास करीत आहेत. गॅसगळती किंवा विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
श्रीनाथ स्विट होमची आग वेगाने शेजारच्या महाराष्ट्र मटन शॉप व सायबा अमृततुल्य दुकानात पसरली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या सनसिटी अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीचा भडका उडून परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे नांदेड सिटी येथील पीएमआरडीएच्या अग्निशमन जवानांची मदत घेण्यात आली. पाण्याचा मारा करून जवानांनी आग नियंत्रणात आणली.