काव्य, नृत्याचा सुरेल मिलाफ

काव्य, नृत्याचा सुरेल मिलाफ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महाकवी कालिदास यांच्या शब्दांना मिळालेली प्रभावी नृत्य आणि संगीताची साथ, अशा वातावरणात रसिकांनी काव्य आणि नृत्याच्या सुरेल मिलाफाचा आनंद घेतला. निमित्त होते महाकवी कालिदास जयंतीनिमित्त साधना कला मंच आणि नृत्यांजली संस्थेच्या वतीने आयोजित 'आषाढस्य प्रथम दिवसे' या नृत्य मैफलीचे. साधना कला मंचच्या अध्यक्षा मंजिरी ताम्हणकर, उपाध्यक्ष गिरीश झांबरे, वसुधा कर्दळे, खजिनदार प्रदीप वालगावकर आदी उपस्थित होते. 'वेदना' या सूत्राभोवती गुंफलेल्या दोन कथांचे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून झालेले सादरीकरण रसिकांची भरभरून दाद घेऊन गेले. एखादा संवेदनशील कवी त्याच्या आयुष्यातील एखाद्या दुःखद घटनेमुळे व्यथित होतो आणि त्या वेदनेतून एक लखलखीत चिरंतन काव्य साकार होते, त्याचा सृजनशील प्रवास रसिकांच्या अंतर्मनाला सुखावून गेला.

कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन नृत्यांगना संध्या धर्म आणि मीता पाठक यांचे होते. यशश्री जाधव, जान्हवी कशेळीकर, साक्षी पासकंटी, दर्शना पासकंटी, श्रावणी ऐंंचवार आदींनी कार्यक्रम सादर केला. 'संगीत शाकुंतल' या नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संस्कृतमधील श्लोकाचा संदेश रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'अलारिपू' या भरतनाट्यममधील रचनेचा प्रभावी पद्धतीने वापर करण्यात आला.

वसंत, ग्रीष्म आणि वर्षा या ऋतूंचा निसर्गातील विविध घटकांवर, मानवी जीवनावर आणि मनावर होणारा परिणाम 'ॠतुसंहार'च्या सादरीकरणाने नेमक्या पद्धतीने टिपला. महाकवी कालिदासांच्या ऋतुसंहारातून व्यक्त झालेले अनेक बारकावे, सविस्तर तपशील आणि त्यातून येणारी विलक्षण अनुभूती, या सगळ्याबरोबर नृत्य सादरीकरणाशी केलेली बांधणी नयनरम्य ठरली. या मैफलीची सांगता अमृतवर्षिणी रागातील तिल्लानाने झाली. प्रतिभा पाठक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे निवेदन कृष्णा चतुर्भुज यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news