कालवा अस्तरीकरणास शेतकर्‍यांचा पाठिंबा; लासुर्णे येथील सभेला प्रतिसाद

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बारामती जलसंपदा उपअभियंता अश्विन पवार व इतर.
लासुर्णे (ता. इंदापूर) येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बारामती जलसंपदा उपअभियंता अश्विन पवार व इतर.

जंक्शन; पुढारी वृत्तसेवा: जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणास इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांनी पाठिंबा दर्शविला आहे. कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास आवर्तनातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.
लासुर्णे (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 24) बेलवाडी, कळंब, चव्हाणवाडी, जाचकवस्ती, थोरातवाडी, कुरवली व लासुर्णे परिसरातील शेतकर्‍यांची सभा झाली. या वेळी शेतकर्‍यांनी अस्तरीकरणास पाठिंबा दिला.

इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अ‍ॅड. हेमंत नरुटे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'कालवा अस्तरीकरणास शेतकर्‍यांनी विरोध करणे चुकीचे आहे. अस्तरीकरणाचा सर्वांना फायदा होऊन जास्त प्रमाणात पाणी मिळणार आहे. अस्तरीकरणानंतर पाणी जमिनीत मुरणार आहे.' विशाल जाधव, रणजित पाटील, केशव नगरे, दिलीप पांढरे, प्रशांत निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त करून अस्तरीकरणास पाठिंबा दिला.

बारामती जलसंपदा विभागाचे उपअभियंता अश्विन पवार म्हणाले, 'निरा डावा कालवा अस्तरीकरणामुळे शेतकर्‍यांना फायदा होणार आहे अस्तरीकरणामुळे 30 ते 35 टक्के पाण्याची बचत होणार आहे. आवर्तन कालावधी पाच ते दहा दिवसांनी कमी होण्यास मदत होणार आहे.' शाखाधिकारी शायमराव भोसले, शंकर चौरंग, दिनेश वाघ, दत्तात्रेय काळे व परिसरातील शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यात फक्त नऊ किलोमीटरचे अस्तरीकरण होणार आहे. भविष्यात पाणी कमी होणार असल्याने अस्तरीकरण गरजेचे आहे. अस्तरीकरणानंतर लाभधारक शेतकर्‍यांबरोबरच सर्व शेतकर्‍यांना जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

                                      अश्विन पवार, उपअभियंता, बारामती जलसंपदा विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news