कात्रजमध्ये वाहतुकीला विद्युत खांबांची अडचण

कात्रजमध्ये वाहतुकीला विद्युत खांबांची अडचण
Published on
Updated on

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : मंतरवाडी- कात्रज बाह्यवळण मार्गावर उंड्री ते हांडेवाडी चौकादरम्यानच्या रस्त्यावर विद्युत खांब आले असून, त्याचा अडथळा वाहतुकीस ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणारे हे विद्युत खांब तातडीने दूर करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले, मात्र मंतरवाडी ते खडीमशिन चौकादरम्यानच्या रस्त्यावर विद्युत खांब असल्यामुळे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रस्ता रुंद न करता तसाच सोडून दिला आहे.

त्यामुळे येथून एका वेळी एकच वाहन जाते. मोठे वाहन असेल तर वाहन चालविताना कसरत करावी लागते. अनेक विद्युत खांब रस्त्याच्या मध्यभागी असल्याने ते वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. अवजड वाहनांबरोबरच स्थानिक वाहतूक या मार्गावर मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या शाळा सुरू असल्याने विद्यार्थी वाहतूक करणार्‍या अनेक खासगी बसेससुद्धा या मार्गे ये-जा करत असतात.

रात्रीच्या वेळेस समोरून येणार्‍या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे डोळे दीपतात आणि वाहन या विद्युत खांबांना धडकून अपघातग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे. रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, खडीमशिन चौकात सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

येथील रहिवाशांनी केलेली आंदोलने व पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती, मात्र महावितरणने अद्याप रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारे खांब न हटविल्यामुळे येथील वाहतूककोंडीची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे महावितरणने तत्काळ येथील विद्युत खांब हटवावेत, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन हांडे यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news