कात्रज; पुढारी वृत्तसेवा: पुणे-बंगळुरू जुन्या महामार्गावरील कात्रज घाट परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. घाटरस्त्यात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हे फलक लावले आहेत. कात्रज घाटरस्ता परिसरात एका बाजूला डोंगर, तर दुसर्या बाजूस खोल दरी आहे. अनेक ठिकाणी तीव्र वळण तसेच काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असतानाही याठिकाणी दिशादर्शक चिन्ह तसेच अपघाताबाबतचे फलक लावण्यात आले नव्हते.
त्याचा त्रास या रस्त्याने ये-जा करणार्या वाहनचालकांना होत होता. तसेच, फलकांअभावी अपघाताचा धोकादेखील वाढला होता. अखेर, वाहतुकीच्या सुरक्षेची दक्षता घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता देवेन मोरे म्हणाले, 'वास्तव स्थितीची माहिती वाहनचालकांना व्हावी व वाहतूक सुरक्षित व्हावी या उद्देशाने आवश्यक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करत प्रवास करावा.'