काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंचा राजीनामा

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंचा राजीनामा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि रोहित टिळक यांनीही राजीनामे दिले आहेत.
पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांनी पदे रिक्त करण्याच्या राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष मिळणार आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे नुकतेच काँग्रेसचे नवसंकल्प राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

या अधिवेशनात एका व्यक्तीकडे एकच पद आणि पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल, तर पदे रिक्त करण्याचा ठराव झाला होता. त्यामुळे शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिवेशनात तब्बल 51 जणांनी तत्काळ राजीनामे दिले. त्यामध्ये
पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. छाजेड व टिळक यांचाही समावेश आहे.

बागवे यांंच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ते सहा वर्षे शहराध्यक्षपदावर आहेत. आता पक्षाच्या नवीन धोरणानुसार शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला असल्याचे बागवे यांनी सांगितले. तर अ‍ॅड. छाजेड आणि टिळक हे सहा वर्षे प्रदेश सरचिटणीस होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याव्यतिरिक्तही आणखी काही मंडळी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर असून त्यांनाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

नवीन अध्यक्षाची निवड कधी?

महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही निवडणूक होईल असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच नवीन अध्यक्षांची निवड होणार की नवीन अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत बागवे यांच्याकडे तात्पुरता पदभार राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी अरविंद शिंदे, आबा बागुल, दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, संजय बालगुडे अशी काही प्रमुख नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news