कसबा पेठ : यंदा मध्यवस्तीत भव्य देखावे; हम्पीचा दगडी रथ, अर्जुन रणगाड्याच्या प्रतिकृतीचे राहणार आकर्षण

कसबा पेठ : यंदा मध्यवस्तीत भव्य देखावे; हम्पीचा दगडी रथ, अर्जुन रणगाड्याच्या प्रतिकृतीचे राहणार आकर्षण
Published on
Updated on

कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: कोरोना साथ गेल्यावर दोन वर्षांनी पुण्यात गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पांच्या स्वागतासाठी कसबा पेठेतील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केल्याचे पाहावयास मिळाले. अनेक मंडळांकडून भव्य देखावे साकारण्यात आले आहेत. हम्पीच्या दगडी रथाची प्रतिकृती, भारताच्या विजयाचे प्रतीक अर्जुन रणगाड्याची भव्य प्रतिकृती, भारतीय सशस्त्र सेवा, पावनखिंडीचा रणसंग्राम असे भव्य-दिव्य देखावे यंदा मध्यवस्तीतील पेठांमध्ये पाहावयास मिळणार आहेत.

कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने यंदा 'आझादी का अमृतमहोत्सव' या विषयावर देशवासीयांच्या मनात युद्धभूमी व सैनिकांचं प्राणार्पण या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी विजयाचे प्रतिक असलेला अर्जुन रणगाड्याची प्रतिकृती साकारणार आहे. ही प्रतिकृती सुधीर सुतार आणि स्वाती सुतार या कलाकार दाम्पत्यासह त्यांच्या 19 कारागीरांनी 8 दिवसांत उभी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत नादब्रह्म व आवर्तन या दोन पथकांचा सहभाग असल्याचे मंडळाचे अध्यक्ष हेमंत कडू यांनी सांगितले.

जनार्दन पवळे संघाच्या वतीने यंदा हम्पी रथाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. 14 फूट रुंद आणि 25 फूट उंच असणार्‍या देखाव्याचे कलादिग्दर्शक सिद्धार्थ तातूसकर यांनी मंडळातील तांबे व पितळाची कारागिरी करणार्‍या बारा जणांसह दोन महिन्यांपूर्वीपासून प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू केले. नागरिकांना पहिल्या दिवसापासून देखावा पाहता येणार असून, त्याचे उद्घाटन पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असल्याचे उत्सवप्रमुख राकेश डाखवे यांनी सांगितले.

श्री जुना काळभैरवनाथ मंडळाचे यंदा 90 वे वर्ष असून, मंडळ यंदा भारतीय सशस्त्र सेवा हा देखावा सादर करणार असून, त्यातून भारतीय नौसेना, वायुसेना व थलसेना यांच्याबद्दल माहिती व उपलब्धी दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे शुभम दुगाने, ओंकार गुल्हाने यांनी सांगितले. 'ऑस्कर मित्रमंडळा'चे यंदा 38 वे वर्ष असून मंडळाने यंदा शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मर्द मावळ्यांनी बलिदान दिले, बाजीप्रभूंच्या रक्ताने घोडखिंडीचे नाव पावनखिंड ठेवण्यात आले.

या वर्षीच्या गणेशोत्सवात पावनखिंडीचा रणसंग्राम हा देखावा मंडळ सादर करणार असल्याचे अध्यक्ष योगेश साळुंके यांनी सांगितले. राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ यंदा 'सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा' हा जिवंत देखावा सादर करणार आहे. पुस्तककोट (बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य), रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल दळवी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news