कळसची ग्रामपंचायत झोपेत, गाव आजारी

कळसची ग्रामपंचायत झोपेत, गाव आजारी
Published on
Updated on

कळस; पुढारी वृत्तसेवा: दिवसेंदिवस डासांची उत्पत्ती वाढल्याने ग्रामस्थांना निरनिराळ्या आजारांनी ग्रासले असून, खासगी दवाखाने रुग्णांनी भरून गेले आहेत. ग्रामपंचायत मात्र झोपी गेल्यासारखी दिसत असून, याकडे दुर्लक्ष होत आहे. या डासांमुळे कळस परिसरातील लहान मुले, वृद्धांसह अनेक ग्रामस्थांना थंडी, ताप, अंगदुखी, खोकला आदी साथीच्या आजाराने ग्रासले आहे. येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात जागा अपुरी पडताना दिसत आहे. काही रुग्ण बाहेरगावी उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे.

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन दिवसांत याबाबत दक्षता घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. कळस ग्रामपंचायतीने आतातरी झोपेतून जागे होऊन तातडीने दक्षता घेऊन गावासह वाड्या-वस्त्यांवर डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात सर्वत्र मोकळ्या जागांवर गवत उगवले आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचत असल्याने या ठिकाणी डासांची उत्पत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील ग्रामस्थांसह जनावरांनाही या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने दक्षता घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील गावासह गोसावीवाडी, पिलेवाडी, बागवाडी, बिरंगुडी, विठ्ठलवाडी आदी ठिकाणांहूनच्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news