

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
आकुर्डी खंडोबामाळ चौकात 'येथे कचरा टाकू नये', असा सूचना फलक लावण्यात आला आहे. या सूचना फलकाजवळच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचरामुक्त कुंडी शहर करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी घरोघरी जावून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे काम केले जात आहे.
एकत्रित कचरा आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. कोणालाही कचरा उघड्यावर टाकण्याची परवानगी नाही. तरीदेखील काही भागांमध्ये सर्रास कचरा उघड्यावर टाकलेला आढळतो. यामुळे इथून जाताना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. आकुर्डी खंडोबामाळ चौकात महापालिकेने लावलेल्या फलकावर स्मार्ट नागरिकांचे स्मार्ट शहर घंटागाडीमध्ये कचरा टाकून करु या सुंदर, असे घोषवाक्य लिहिले आहे. त्याच ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत.