

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये झाडूकाम करणार्या कंत्राटी महिला कर्मचार्याच्या नावे बोगस पगार काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरून अधिकार्यांमध्ये कार्यालयात खडाजंगी झाली असून, हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याची चर्चा आहे. सहायक महापालिका आयुक्तांनी मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया दै. 'पुढारी'कडे दिली आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये झाडूकाम हे कंत्राटी पद्धतीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, महापालिकेकडे कायमस्वरूपी सफाई कर्मचार्यांची संख्या अधिक असताना देखील मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याचे कागदोपत्री दाखवून दरमहा लाखो रुपयांची बिले काढली जात आहेत.
त्याचाच एक भाग नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात उघडकीस आला आहे. झाडणे काम करण्यासाठी कामावर नसताना देखील एका व्यक्तीच्या नावे गेले अनेक महिने बोगस पगार लाटल्याचे समोर आले आहे. त्या प्रकरणावरून नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील वातावरण गरम झाले आहे. अधिकार्यांमध्ये देखील खडाजंगी झाली आहे. अधिकार्यांनी ठेकेदाराला बोलावून चौकशी केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचविण्याचे फर्मान सोडले होते. मात्र, नंतर या प्रकरणावरून 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
मतदारसंघातील तिन्ही प्रभागांसह नव्याने समावेश झालेल्या लोहगाव, वाघोली या ठिकाणी देखील कंत्राटी कर्मचार्यांची क्रॉस तपासणी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा सुज्ञ पुणेकरांनी व्यक्त केली आहे. बिल काढताना आरोग्य निरीक्षकापासून ते वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत सर्वांची सही असते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी कार्यालयीन चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– सोमनाथ बनकर, सहायक महापालिका आयुक्त
याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.'याबाबतचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर नियमांनुसार कारवाई केली जाईल.'
-संजय गावडे, उपायुक्त, परिमंडळ 1