

औंध : पुढारी वृत्तसेवा: औंधमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत डी. पी. रस्त्यावर सुशोभीकरणासाठी उभारलेल्या कलाकृतींची दुरवस्था झाली आहे. या कलाकृती धुळीने माखल्या असून, येथे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि कचरा साचला आहे. काही कलाकृतींचे रंगही उडाले आहेत. गाजावाजा करून उभारलेल्या या कलाकृतींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. कलाकृतींची देखभाल आणि त्यांची अवस्था सुधारण्याकडे लक्ष देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
या रस्त्याचे जरी सुशोभीकरण झाले असले तरी कलाकृतींची अवस्था नीट नाही. काही लोकांनी येथे कचरा फेकला आहे तर तंबाखूच्या पिचकार्यांनी या कलाकृतींची अवस्था खराब झाली आहे. भरारी, अग्निपंख, मातृत्व आणि गावगाडा अशा विविध संकल्पनांवर येथे कलाकृती साकारण्यात आल्या असून, या सर्वच कलाकृतींची अवस्था नीट नाही. त्यांचे रंग उडाले आहेत. याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कलाकृतींच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, कलाकृतींना सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.