

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये ऑनलाईन वैद्यकीय नोंदीसाठी वापरली जाणारी एचआयएमएस सहा महिन्यांपासून बंद पडली आहे. दोन महिन्यांत नवीन प्रणाली बसवण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण विभागाचे अद्याप पूर्ण केलेले नाही. शासकीय पातळीवर अद्याप समांतर यंत्रणा विकसित झालेली नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे आज सोमवारी पुणे दौर्यावर आहेत. ते ससून रुग्णालयास भेट देऊन पाहणी करणार आहे. एचआयएमएस यंत्रणेचा प्रश्न महाजन गांभीर्याने घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने त्यांच्या अंतर्गत येणार्या 18 सरकारी रुग्णालयांमधील एचएमआयएस प्रणाली 5 जुलै रोजी रात्री बारापासून बंद करण्याचे आदेश दिले आणि एकच गोंधळ उडाला. यंत्रणा अचानक बंद केल्यामुळे रुग्णांची नोंदणी व केस पेपर देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ससून रुग्णालयातने मनुष्यबळ वाढवून रुग्णांना दिसाला देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील 18 शासकीय वैदयकीय महाविदयालये आणि रुग्णालयांमध्ये येणार्या रुग्णांना यंत्रणा बंद केल्याने मोठा फटका बसत आहे. त्यामुळे केसपेपर, तपासण्यांचे पेपर हे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एचएमआयएस प्रणाली असताना या तपासण्या डॉक्टरांना संबंधित रुग्णाचा एमआरडी नंबर टाकल्यास अहवाल कोठेही दिसत होते. त्यामुळे निदान व उपचारही वेगाने होत होते. आता नवीन यंत्रणेबाबत वेगाने निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.