

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातील गावठाण परिसरात राहणार्या एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर मंगळवारी (दि.6) रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, या वेळी निवासी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या बालकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणार्या निवासी डॉक्टरांवर कर्तव्यात कसूर करत असल्याने यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी या वेळी संतप्त नागरिकांनी केली.
आरोग्य केंद्रातील निवासी डॉक्टर किरण जाधव या प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहायला आहेत. या कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर होत्या. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाही. मागील एक आठवड्यापासून गैरहजर असून विशेष बाब म्हणजे याची कुठेही दप्तरी नोंद नाही. सरकारी दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने प्रसूती वेदना येणार्या महिलेला कामशेत शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
माजी उपसरपंच नीलेश दाभाडे, अभिजित शिंनगारे व सरपंच रुपेश अरुण गायकवाड यांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींना पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. तसेच जिल्हा परिषद पुणे मुख्य आरोग्य अधिकारी भगवान पवार यांना चौकशी कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय घटनास्थळाची पाहणी वरिष्ठ अधिकारी करणार आहेत, अशी माहिती सरपंच गायकवाड यांनी दिली.
निवासी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला वेळेत उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्यांना बाळ गमवावे लागले. याप्रकरणी चौकशी करून वरिष्ठांकडे संबंधित डॉक्टरांवर कारवाईसाठी अहवाल पाठवणार आहे.
– डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका आरोग्य अधिकारी