संतोष शिंदे :
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने या वर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशमूर्तींच्या उंचीसाठी कोणतीही मर्यादा नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच, मंडळ नोंदणीत देखील सूट दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने देखील सर्व घटकप्रमुखांकडून निर्धारण अहवाल मागवल्याची सूत्रांची माहिती आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील लोकप्रिय असणारी दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती. प्रशासनाने उत्सवांवर अनेक निर्बंध लागू केले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम यांसह अन्य धार्मिक सणांवर असलेले निर्बंध हटवण्याची घोषणा केली. त्यामुळे यंदा गणेश मंडळांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पाहावयास मिळत आहे.
या उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून सर्व घटकप्रमुखांना सतरा मुद्द्यांवर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, मागील काळात उत्सवांदरम्यान घडलेल्या घटनांची यादी देखील देण्यात आली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी विशेष खबरदारीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात काम सुरू करण्यात आले आहे.
या दिवशी राहणार चोख बंदोबस्त
31 ऑगस्ट – गणेश चतुर्थी, गणेशाची प्रतिष्ठापना
1 सप्टेंबर – दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
4 सप्टेंबर – पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
6 सप्टेंबर – सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
9 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी, दहा दिवसांच्या
गणेशमूर्तींचे विसर्जन
संमिश्र लोकवस्तीत विशेष लक्ष
उत्सवादरम्यान संमिश्र लोकवस्ती असलेल्या भागात पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात राहणार आहेत. दरम्यानच्या काळात समाजकंटकांवर करडी नजर ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
घातपातविरोधी पथकाचा 'वॉच'
उत्सवांच्या ठिकाणी घातपात विरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, मिरवणूक मार्गांवर पोलिस मदत केंद्र, बिनतारी संदेश यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहे. संशयित हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही आणि नाईट व्हिजन दुर्बिणीचा देखील यंदा वापर केला जाणार आहे.
महासंचालक कार्यालय आणि राज्य गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात येणारे धार्मिक सण शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड