

पुणे; पुुढारी वृत्तसेवा: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) डेपोतून टँकर भरल्यानंतर डिलेव्हरी देण्यापूर्वी पेट्रोल -डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणार्या चार ते पाच टोळ्या लोणी काळभोर परिसरात सक्रिय आहेत. दोन दिवसाला एक टँकर इंधनाची चोरी करून थेट काळ्याबाजारात विक्री केली जाते. साधारण या इंधनाची किंमत 18 ते 20 लाख रुपये असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मात्र, इंधनाचे लोणी खाल्ले कोणी-कोणी, याचाच तपास करण्याची आता वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून बिनबोभाट हा प्रकार येथे सुरू आहे. इंधनाच्या काळ्याबाजारात मोठं अर्थकारण दडलंय.
खाकीपासून खादीपर्यंत मर्जी सांभाळून या टोळ्या आपले काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे इंधनचोरीचे लोणी अनेकांचे खिसे गरम करीत असल्याचे दिसून येते. थेट गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करून ही कारवाई केली. मात्र, स्थानिक पोलिस एवढे दिवस कसे अनभिज्ञ होते, असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित केलो जातोय. गुन्हे शाखा संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई करीत असताना याची चाहूल लागल्यानंतर स्थानिक पोलिसांनी डिझेल चोरीत दीड वर्षापासून फरार असलेल्या एकाला अटक केली. नेमकी गुन्हे शाखेची कारवाई सुरू असतानाच ही कारवाई कशी, असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
…इंधन असे येते काळ्या बाजारात
बीपीसीएलच्या तेल टेपोत टँकर भरण्यासाठी सर्व अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा आहे. मात्र, तरीदेखील तेथील काही लोकांना हातीशी धरून हे तेल तस्करी माफिया टँकर भरून काढताना मोजून इंधन भरल्यानंतरदेखील 15 लिटरच्या एका बादलीने सहा ते सात बादल्या टाकतात. तसेच गाडीची इंधन टाकीदेखील फुल्ल करून भरतात. हे सर्व झाल्यानंतर ती गाडी डिलेव्हरी देण्यासाठी पेट्रोल पंपाकडे मार्गस्त होते. दरम्यान, काही अंतर पुढे गेल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी ही गाडी थांबते. सील केलेल्या लॉकला हात न लावता, एका रॉडच्या साह्याने आतला नॉब फिरवला जाते. तो फिरवताच इंधनाची मोठी धार खाली लागते. मोठ्या कॅनमध्ये हे इंधन काढले जाते. पुढे हीच गाडी पंपावर जाते. त्या वेळी तेथील कर्मचारी इंधन मोजून घेतात. इंधन कमी आल्याचे त्यांच्याकडून डेपोतील कर्मचार्यांना कळवले जाते. जेवढे इंधन आले तेवढेच पैसे त्यांच्याकडून घेतले जातात. त्यामुळे ही आश्चर्याची बाब आहे. भरताना मोजून भरलेले इंधन अर्ध्या वाटेत गायब होते. त्यानंतर त्याची काळ्याबाजारात विक्री केली जाते.
ओळखलं का मला? मी तर ठाणेदाराचा भाचा
कारवाईसाठी सामाजिक सुरक्षा विभागाने धडक मारल्यानंतर घटनास्थळी एक लाल रंगाच्या शर्टात व्यक्ती हजर झाला. कारवाई सुरू असताना संशयित आरोपींकडे चौकशी सुरू असताना त्या लाल शर्टवाल्या व्यक्तीने ओळखलं का मला? मी तर ठाणेदारांचा भाचा म्हणत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचा संशयित आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न तेथे असलेल्या अधिकार्यांच्या लक्षात आला. तेव्हा त्यांनी त्याला गुन्हे शाखा काय असते, सांगत त्याची मामेगिरी उतरवली. त्यानंतर त्याचा चेहराच पडला. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तो तर शिकाऊ म्हणून बीपीसीएलमध्ये कार्यरत होता. परंतु, त्याचा वरदहस्त सर्वांवर असल्याचे या वेळी पाहायला मिळाल्याचे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले.
सामाजिक सुरक्षा विभागाची वेषांतर करून कारवाई
ज्या ठिकाणी डिझेल, पेट्रोलची चोरी केली जात होती. त्या ठिकाणाची माहिती मिळली होती. मात्र, पुढे आणि मागे 10 किलोमीटरवर मदतीसाठी कोणीच येणार नाही, अशी घटनास्थळाची परिस्थिती होती. त्यामुळे या कारवाईमध्ये मोठी रिस्क होती. ती रिस्क सामाजिक सुरक्षा विभागाने उचलली. त्यांनी महिला पोलिस अधिकार्याला बुरखा परिधान करण्यास सांगून वेषांतर करण्यास भाग पाडले. इतरही पोलिस अधिकार्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती वाटावा व एखादा भाजी विक्रेता वाटावा, असा गेटअप केला होता. ज्या वेळी ही डिझेलची चोरी सुरू होती. तेथे पोलिसांनी धडक मारून चार ते पाच जणांना ताब्यात घेतले.
रस्त्याच्या कडेलाच ताडपत्रीवर भरतो बाजार
बीपीसीएल डेपोपासून तीन किलोमीटर अंतरावर अगदी रस्त्याच्या कडेलाच सर्वांच्या संगनमतातून साधी ताडपत्री मारून हा प्रकार सुरू होता. आपण पेट्रोल-डिझेल चोरी करतोय, याचे कोणतेही भय त्यांना नव्हते. अगदी रस्त्याच्या कडेलाच सुरू असलेली चोरी त्यांच्या अंगलट आली आहे. दहा-पंधरा गुंठ्यात हा सर्व प्रकार सुरू होता. डेपोत जाणारे ट्रक रस्त्याने जाताना त्यांना हा प्रकार दिसत होता. परंतु, जिवाच्या भीतीमुळे कोणीही समोर येत नव्हते
निवृत्त एसीपींपासून अनेकांचे फोन
जेव्हा कारवाईसाठी गुन्हे शाखेची टीम गेल्यानंतर त्यांना त्यांच्या कारवाईपासून रोखण्यासाठी वेगळ्या पद्धतीने लोकप्रतिनिधींची ओळखही सांगण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याला गुन्हे शाखेनी कोणतीही दाद दिली नाही. या वेळी निवृत्त एसीपीनेही फोन करून कारवाईत शिथिलता बागळण्याची विनंती केल्याचा प्रकारही या निमित्ताने पुढे आला आहे. या कारवाईमागचे अर्थकारण गुन्हे शाखेने कोणालाही न जुमानता हाणून पाडले आहे.