

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, भगर या उपवासाच्या पदार्थांची आवक झाली असून, शहर आणि जिल्ह्यातून मागणी वाढल्याने साबूदाणा, शेंगदाणा व भगरीचे दर तेजीत आहेत. तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यात साबूदाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. संपूर्ण देशात सेलम जिल्ह्यातील साबूदाणा विक्रीसाठी पाठविला जातो. यंदा साबूदाण्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. बाजारात सध्या रोज 100 ते 125 टन साबूदाण्याची आवक होत आहे. सध्या आषाढी एकादशी असल्याने साबूदाण्याला मोठी मागणी आहे.
परिणामी साबूदाण्याच्या भावात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ श्रावण व भाद्रपदामध्ये उपवास केले जात असल्याने पुढील काळात साबूदाण्याचे भाव चढेच राहणार आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साबूदाण्याच्या मध्यम मालाला 52 ते 55 तर उच्च मालाला 55 ते 60 रुपये भाव मिळत आहे. लहरी हवामानामुळे यंदा भगरीच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांमध्येच भगरीचे भाव उंच निघाले आहेत. मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून 40 ते 50 टनांची आवक होत आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भगरीचे भाव 110 ते 115 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर देशातील तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात शेंगदाण्याचे उत्पादन घेतले जाते.
सध्या बाजारात मध्य प्रदेश व कर्नाटक येथून शेंगदाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, मध्य प्रदेशातून दाखल होणार्या मालामध्ये हलक्या मालाचे प्रमाण जास्त आहे. त्यात कर्नाटकातूनही आवक कमी आहे. परिणामी, बाजारात दर्जेदार मालाची उपलब्धता कमी असून शेंगदाण्याचे दर तेजीत आहे. आषाढीमुळे शेंगदाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून बाजारात दररोज 100 ते 125 टन माल दाखल होत आहे. दिवाळीनंतर नवीन शेंगदाण्याची आवक होईल. त्यानंतर, दर खाली येतील. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेंगदाण्याचे दर प्रतवारीनुसार घुंगरू 100 ते 105, भारी माल 105 ते 110, स्पॅनिश 110 ते 115 रुपये किलोने मिळत असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.