

आळंदी; पुढारी वृत्तसेवा: औद्योगिकीकरण होत असलेल्या चिंबळी (ता.खेड) पंचक्रोशीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीच्या छोट्याशा तुकड्यालाही महत्त्व आले आहे. अशावेळी गावकरी रहदारीसाठी वापरत असलेला परंतु खाजगी मालकीचा असलेला रस्ता गावासाठी देत रुंदीकरणास शिंदे आणि बहिरट कुटूंबाने तयारी दाखवली आहे. चिंबळी येथील पद्मावती मंदिर ते माजगाव रस्त्यांतर्गत येणार्या बहिरट व शिंदे यांच्या जमिनीमधून जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. खाजगी जागेवर असलेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. प्रवाशांना मोठा त्रास होत होता.
सदर ठिकाणी दोन्ही बाजूच्या शेतकर्यांनी आपसात वाद न करता ह.भ.प मारुती पंढरीनाथ बहिरट आणि किसन पांडुरंग शिंदे व तुकाराम पांडुरंग शिंदे या दोन्ही कुटुंबीयांनी सहमतीने 250 फूट लांब रस्ता स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून देऊ केला आहे. सदर रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने मुरुमीकरणास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे संचालक शामराव बहिरट ,उद्योजक अर्जुन शिंदे, पोलीस कर्मचारी रामदास बहिरट, स्वागत कृषी पर्यटनचे संचालक शंकर बहिरट यांनी प्रयत्न केले.