आता हवाय केंद्राचा सिग्नल; पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा आराखडा तयार

आता हवाय केंद्राचा सिग्नल; पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा आराखडा तयार

प्रसाद जगताप

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे बोर्ड, निती आयोग, राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता केंद्राच्या कॅबिनेट कमिटीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. 'महारेल'कडून या रेल्वेचा आराखडादेखील तयार असून, मंजुरीनंतर अवघ्या तीन वर्षांतच या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने 'पुणे-नाशिक सेमी हायस्पीड' प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहेत.

या प्रकल्पाला नुकतीच महाराष्ट्र शासनानेदेखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या कॅबिनेट कमिटीच्या मंजुरीची म्हणजेच अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. या संदर्भातील आराखडा महारेलने तयार केला असून, तीन ते साडेतीन वर्षांत याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे शहरातील 4 तालुक्यांमधून, तसेच 102 गावांमधून ही रेल्वे जात आहे. पुण्यातील 54 गावे या प्रकल्पात येत आहेत.

जयस्वाल यांच्या अखत्यारीत काम
महारेलच्या वतीने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांच्या अखत्यारीत सुरू आहे. कोणताही प्रकल्प हातात दिला, की तो वेगात पूर्ण केला जातो, अशी जयस्वाल यांची ओळख आहे. सुरत-जळगाव 310 किमी अंतराचे कामदेखील त्यांनी अवघ्या 3 वर्षांत पूर्ण केले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाचे कामदेखील वेगाने होणार आहे.

ही आहेत स्थानके…
पुणे, हडपसर, मांजरी, कोळवडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूत, सकूर, आंबोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मुहदरी, शिन्दे, नाशिक.

पुणे-नाशिक प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत
पुणे स्टेशन येथील मालधक्का परिसरातून ही रेल्वे गाडी सुटणार असून, हडपसर, लोणी काळभोरपर्यंत मेट्रोप्रमाणे उन्नत मार्गावरून जाईल. त्यानंतर ती जमिनीवरून धावेल. ही महाराष्ट्रातील पहिली ब—ॉडगेज सेमी हायस्पीड रेल्वे असणार असून, कोणत्याही परिस्थितीत तिचा वेग कमी होणार नाही, अशी योजना करण्यात आली आहे. पुणे-नाशिक प्रवासासाठी सध्या 6 तास लागतात. या सेमी हायस्पीड रेल्वेमुळे तो वेळ कमी होऊन पुणे-नाशिक प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत होणार आहे.

रेल्वे गाडीची वैशिष्ट्ये
235 किलोमीटर अंतर
18 बोगदे
19 उड्डाणपूल
विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग
6 कोच सुरुवातीला,
नंतर 12 ते 16 कोच बसवणार
सुरूवातीला 200 किलोमीटर प्रतितास वेग, नंतर 250 पर्यंत वाढवू शकणार
सर्व मार्गावर 20 स्टेशन्स
16 हजार 39 कोटींपर्यंत
खर्च लागणार

प्रकल्पाचे नियोजन
2 जून 2020 ला रेल्वे
बोर्डाची मंजुरी
हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार
चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेरला
प्रमुख स्थानके
मालवाहतुकीसाठी लोडिंग, अनलोडिंग सुविधा
प्रकल्प 1200 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
हायस्पीड रेल्वेगाडीच्या मार्गावर एक्स्प्रेस आणि मालगाड्यादेखील धावणार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news