आकुर्डी विठ्ठल मंदिरात सोहळ्याची तयारी

आकुर्डीतील विठ्ठल मंदिर परिसरातील तयारीची पाहणी करताना महापालिका आयुक्त राजेश पाटील.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिर परिसरातील तयारीची पाहणी करताना महापालिका आयुक्त राजेश पाटील.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळानंतर दोन वर्षांनी यंदा आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकर्‍यांच्या स्वागताची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हजारो वारकर्‍यांसमवेत शहरात दाखल होतो. हा पालखी सोहळा परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असतो.

आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आहे. हे शिवकालीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज पायी वारी करत त्यावेळी महिला मुक्काम येथील विठ्ठल मंदिरात करत असत. त्यामुळे पालखी सोहळ्याचा मुक्काम याठिकाणी असतो. वारकर्‍यांच्या सेवेसाठी कुटे कुटुंबीयच नाही तर शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो, असे मंदिराचे विश्वस्त गोपाळ कुटे यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यासाठी महापालिकेकडून मंदिर व परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारी मोठे शेड बांधले आहे. त्यामध्ये दर्शनरांग तयार केली आहे. तसेच स्वतंत्र खोल्यांची देखील व्यवस्था आहे. वारकरी दरवर्षी ठरल्याप्रमाणे ओळखीच्या घरी विसावा घेतात. शहरवासीय देखील वारकर्‍यांचे पाहुण्यांप्रमाणे प्रेमभावाने आदरातिथ्य करतात. तसेच नेहमीप्रमाणे मनपा शाळांमध्ये देखील काही वारकर्‍यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोहळ्यादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिरामध्ये 32 सीसीटीव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत. महापालिकेकडून यासाठी एक व्हॅन देण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिर परिसरात लावलेल्या कॅमेर्‍यांचे फुटेज दिसणार आहे.

सोहळा आल्यानंतर सायंकाळी सात वाजता आरती केली जाते. दरवर्षी कुटे कुटुंबीयांकडून वारकर्‍यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यांनतर रात्री दहा वाजता, दोन वाजता आणि पहाटे चार वाजता आरती केली जाते. त्यानंतर पहाटे विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा करून पालखी मार्गस्थ होते. पालखी सोहळा आमगनापासून ते मार्गस्थ होईपर्यंत पालिकेकडून आकुर्डी परिसरात सलग पाणी पुरवठा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news