

पुणे; पुढारी वृत्तसेवा: धानोरी येथील एका नर्सिंग होममध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक टाकलेल्या छाप्यात रुग्णांना अॅलोपॅथीची औषधे लिहून देणार्या योग शिक्षिकेला पकडण्यात आले. योग शिक्षिकेच्या आणि क्लिनिकच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तीने रुग्णांना तपासू नये, असा इशारा शहरातील सर्व दवाखान्यांना देण्यात आला आहे.
स्टिंग ऑपरेशनचे नेतृत्व करणार्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, 'महिन्याभरापासून संबंधित योग शिक्षिका डॉक्टर म्हणून रुग्णांना तपासून उपचार करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या नर्सिंग होममध्ये ती महिला प्रसूती करत असल्याची तक्रारही प्राप्त झाली होती. आमच्या टीमने संपर्क साधला असता, मी केवळ योग शिक्षिका असून, प्रॅक्टिस करत नसल्याचे कारण तिने
सांगितले होते.'
बुधवारी स्वत: बळीवंत यांच्यासह आरोग्य तज्ज्ञांच्या पथकाने आणि कायदेशीर पथकातील अधिकार्यांनी नर्सिंग होमला अचानक भेट दिली आणि रुग्णाच्या भूमिकेत एका व्यक्तीला पाठवले. संबंधित महिलेला अॅलोपॅथीची औषधे लिहून देताना रंगेहात पकडण्यात आले. बोगस डॉक्टर शोध आणि कृती समिती स्थापन झाल्यापासून या समितीने शहरातील सुमारे 26 ते 27 बनावट डॉक्टर शोधून काढले आहेत.