मंचर : पुढारी वृत्तसेवा
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने योजनेचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने भाड्याचे जनरेटर लावून पाणीपुरवठा पूर्ववत केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
अवसरी बुद्रुक गावाला 30 ते 35 वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच रमेश कुमार हिंगे यांनी घोड नदीवरून तीन किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी करून पाणी आणले होते. परंतु ही योजना कालबाह्य झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून 15 वर्षांपूर्वी 75 लाख रुपये खर्च करून नव्याने पाणीपुरवठा योजना चालू केली.
त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला. परंतु घोड नदीपात्रातून नळ पाणीपुरवठा करणार्या विहिरीचे 12 लाख रुपये वीजबिल थकल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कुंभार बारव, सात पिपळाची विहीर, डिंभे उजवा कालव्यालगत असलेल्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा सुरळीत चालू होता.
परंतु उन्हाळा असल्याने सर्व विहिरींचे पाणी आटल्याने गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलांना ऐन उन्हात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने महिलांनी सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांना धारेवर धरले. सरपंच पवन हिले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर ,स्वप्नील हिंगे, उपसरपंच सचिन हिंगे, महेंद्र शिंदे यांनी घोड नदीवरील विहिरीची पाहणी करून तेथे जनरेटर लावून गावचा पाणीपुरवठा सुरळीत केला.