पिंपरी : संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने देहूवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सुरक्षेसाठी गेली दोन दिवस कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. अखेर तो दिवस उजाडला… मोदींची एक झलक मिळावी, यासाठी सकाळपासूनच वारकरी, भाविक ट्रक, गाड्यांमधून कार्यक्रमस्थळी पोहोचत होते. देहूतील स्थानिक नागरिकही त्यात सहभागी झाले. सुमारे तीन ते चार किलोमीटर चालत जाऊन हजारोंच्या संख्येने वैष्णव सभामंडपात दाखल झाले आणि या सोहळ्याची याचि देही याचि डोळा अनुभूती घेऊन तृप्त झाले.
अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या वारी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज शिळा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आणि समस्त देहूनगरीचे वातावरण बदलून गेले होते. मोदींच्या स्वागतासाठी फलक, कमानी लागल्या होत्या. मोदींचे आगमन दुपारी 2 वाजता होणार होते.
सकाळी 9 वाजल्यापासूनच देहूतील रस्ते गर्दीने फुलून गेले. विशेष म्हणजे देहूमध्ये आगमन करण्यासाठी सर्व मुख्य रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले होते. थोड्या दुरुन वळसा घालून यावे लागणार होते. कार्यक्रमस्थळापासून तीन ते चार किलोमिटवर पार्किंची सोय होती. तेथून चालत जावे लागणार होते. मात्र, अंतर आणि उन्हाची पर्वा न करता वारकरी, भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे कार्यक्रमाच्या दिशेने जात होते. टाळ-मृदूंगाचा गरज सुरु होता.
विविध शहरांतून मानाच्या दिंड्या, वारकर्यांचे ट्रक दाखल होत होते. पांढर्या रंगातील पारंपरिक वेशभुषेत शेकडो वारकर्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. कार्यक्रमस्थळी भव्य समामंडप उभारण्यात आला होता. अतिशय शिस्तबद्धपणे वारकरी, नागरिक आतमध्ये प्रवेश करीत होते. व्यासपीठावर कार्तिकी गायकवाडच्या सुश्राव्य अभंगवाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मोदींच्या आगमनाची वेळ जशजशी जवळ येत होती तसे आतुर झालेले वारकरी पुंडलीक वरदे हरी विठ्ठल…चा गजर करीत होते.
हात उंचावून एकलयात होणारा हा गरज वातावरण भारावून टाकत होता. मान्यवरांच्या आगमनानंतर मोदींचे आगमन झाले. वैष्णवांच्या या मेळ्यावर नजर फिरविताना चेहर्यावर हास्याची लकेर उमटलेल्या मोदींनी चौफेर अभिवादन केले तेव्हा आनंदाची डोही आनंद तरंग उमटले. सभामंडपातील प्रत्येकजण जल्लोष करीत उभे राहून त्यांना प्रतिसाद दिला. सुमारे दिड तास रंगलेला हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मिळाल्याचे प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून येत होते.
पहिल्यांदाच पंतप्रधान आल्याचा आनंद वेगळा
देहूत येणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरले. व्यासपीठावर याचा उल्लेख होताच भारावलेल्या सभामंडपातून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यासाठी देहूत येण्याची संधी मिळाल्याने मीही स्वत:ला भाग्यवान समजतो, असे सांगून मोदींनी संत तुकाराम महाराजांप्रती आपली भावना व्यक्त केली. शिळा मंदिराच्या पायाभरणीसाठी 1990 च्या सुमारास तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतल्यानंतर ही शिळा फक्त शिळा नसून भक्ती आणि ज्ञानाची कोनशिला असल्याचे मोदी यांनी सांगितले आणि अवघे वैष्णव सुखावून गेले.
चाळीस हजारांवर भाविक
या सोहळ्यासाठी हजारो वारकरी, भाविक उपस्थिती लावणार असल्याने चोख नियोजन करण्यात आले होते. अपेक्षेनुसार मोठ्या संख्येने उपस्थिती लागली. अनेक अडथळे, अनेक बंद केलेले रस्ते असूनदेखील लोक येथे पोहोचत होते. येथील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. एवढेच नव्हे, तर मंडपाबाहेरदेखील लोक बसलेले होते. सुमारे चाळीस हजारांहून अधिक वारकरी, नागरिक याठिकाणी आले होते.
मोदींच्या 'अभंगवाणी' मुळे उपस्थित अवाक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडील संतांची खडानखडा नावे घेत विवेचन केले. वारकर्यांसोबत संपूर्ण सभामंडप भक्तिमय झाला होता. आपल्या विवेचनाला अभंग, ओव्यांचे संदर्भ देत मोदींनी मांडलेले विचार ऐकून उपस्थित अवाक झाले.
सभामंडपात सेल्फीची क्रेझ
मोदी यांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या सभामंडपामध्ये अनेक नागरिकांकडून सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यात येत होते. हे काढलेले व्हीडीओ, फोटो अनेक जण आपल्या व्हाट्सअप, इंस्टाग्राम स्टोरी स्टेटसला ठेवताना पाहायला मिळाले त्यासोबतच अनेकांनी या सभामंडपातून आपल्या स्वतःच्या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्हदेखील केले.
पंतप्रधान देखील एक वारकरीच : फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांकरता हा अत्यंत आनंदाचा अभिमानाचा सोहळा आहे. आज या जगदगुरू तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये भारत देशाचेच नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिलेले आहेत. मला या सोहळ्यात सहभागी होता आले, त्यामुळे मी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.
श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा, बुवाबाजी मोठ्या प्रमाणात कर्मकांड समाजामध्ये वाढले होते, आणि मोठ्या प्रमाणात शोषण सुरू होते, त्यावेळी भागवत धर्माची पताका हातात घेऊन संतांच्या मांदियाळीने या महाराष्ट्राला पुन्हा जागृत केले. ज्ञानेश्वर माऊलींनी याचा पाया रचला, त्याचा कळस झाले ते संत जगद्गुरु तुकाराम महाराज. सश्रद्ध समाज म्हणजेच अंधश्रद्धेपासून दूर असलेला, अशा प्रकारचा एक समाज तयार करण्याचे मोठे काम हे खर्या अर्थाने तुकाराम महाराजांनी केले. मला असं वाटतं की, आजही त्या मार्गाने चालण्याचे काम आपले पंतप्रधान करत आहेत. आपले पंतप्रधान देखील एक वारकरी आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याप्रमाणे त्यांचे काम सुरू आहे.
असा झाला कार्यक्रम :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी हेलिपॅडवर आले.
त्यानंतर मोटारीने 14 टाळकरी कमानीजवळ गेले.
तेथून पायी मुख्य मंदिरात पोहोचले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले.
पंतप्रधानांनी 61 फुटी ध्वजाचे उद्घाटन केले.
प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन.
श्री हरेश्वर महादेवाचे दर्शन.
इंद्रायणी नदी, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व घोरावडेश्वर डोंगराचे दर्शन घेतले.
शिळा मंदिरात जाऊन तुकारामांच्या मूर्तीचे व शिळेचे दर्शन घेतले.
नितीन महाराज, माणिक महाराज, संजय महाराज, संतोष महाराज, भानुदास महाराज, विशाल महाराज, अजित महाराज ही विश्वस्त मंडळी, तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
शिळा मंदिराच्या कोनशिलेचे उद्घाटन.
जगद्गुरूंच्या हस्तलिखित गाथेचे दर्शन.
कडेकोट बंदोबस्त…
मोदी यांच्या आगमनापूर्वी सभा स्थळ आणि तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. सर्वांची कडक तपासणी करण्यात येत होती.
मोदींना निरोप देण्यासाठी गर्दी
मोदी यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरले तेव्हा स्वागतासाठी गर्दी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठीही नागरिकांनी हेलिपॅड परिसरात गर्दी केली.
टाळकर्यांनी मोदींचे स्वागत केले. मुख्य मंदिर आणि परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे मंदिराला एक वेगळेच स्वरूप आले होते. ठिकठिकाणी विविध सजावट साकारण्यात आली होती. येथे तुळसवृंदावन घेऊन महिला, विणेकरी आणि टाळकर्यांनी एकच गजर करत मोदींचे स्वागत केले. या स्वागतामुळे मोदी भारावून गेले होते. त्यांनीही हात जोडून अभिवादन केले.