अन्न-पाण्यावाचून वन्यजिवांचे हाल; भिलारेवाडी वन विभागातील परिस्थिती

अन्न-पाण्यावाचून वन्यजिवांचे हाल; भिलारेवाडी वन विभागातील परिस्थिती
Published on
Updated on

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : एप्रिल महिन्याच्या मध्यावर उष्णता वाढली असून, वन विभागात अन्न-पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून, कात्रज परिसराच्या भिलारेवाडी वन विभागातील वन्यजिवांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत असल्याने मानवी वस्तीकडे येत आहेत. यामुळे वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत वन विभागाकडे विशेष तरतूद नसल्याने स्थानिक कर्मचार्‍यांच्या मदतीने लोकसहभागावर अवलंबून राहावे लागत आहे.

कात्रज घाट व डोंगररांगा परिसरात सुमारे 900 हेक्टर वन विभागाचे मोठे क्षेत्र आहे. विस्तीर्ण वनसंपदेबरोबर वन्यजिवांचा अधिवास आहे. यामध्ये बिबटे, रानडुक्कर, माकडे, वानर, ससे, हरीण, मोर, लांडोर असे विविध जातींचे वन्यजीव पशू-पक्षी यांचा समावेश आहे. उन्हाळ्यामुळे भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी व येवलेवाडी पाझर तलावाने तळ गाठला आहे. अन्नाचादेखील तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अन्न-पाण्यावाचून वन्यजिवांचे हाल होत आहेत. काही प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. स्थानिक वनसेवक, वनरक्षक यांच्याकडून व लोकसहभागातून काही ठिकाणी पाणवठे निर्माण करून पाणी सोडले जात आहे. तसेच, धान्य व फळे पाणवठ्याजवळ ठेवली जात आहेत. मात्र, वन्यजिवांची संख्या पाहता हे कमी पडत आहे. त्यामुळे अधिकची सोय करण्याची गरज निर्माण झाली आहे. आर्थिकद़ृष्ट्या सक्षम व्यक्ती व संस्था, पर्यावरण व वन्यजीवप्रेमींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन वन विभागाकडून केले जात आहे.

गजराज सोशल फाउंडेशनच्या वतीने पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण केले जाते. तसेच, उन्हाळ्यात धान्य व फळे यास्वरूपात मदत केली जाते. या वर्षीही मदत केली जाणार आहे. सजग नागरिक व प्राणिप्रेमींनी मदतीसाठी पुढे यावे.

– महेश धूत, गजराज सोशल फाउंडेशन, पुणे

वन विभागात वन्यजिवांसाठी वेगळी तरतूद नसते. स्थानिक वन कर्मचार्‍यांच्या मदतीने व लोकसहभागातून काही ठिकाणी पाणवठे व अन्न देण्याचे काम केले आहे. तसेच, एका ठिकाणी पाण्याच्या हौदाचे काम सुरू आहे.

– सुरेश वरद, आरएफओ, भिलारेवाडी वन विभाग.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news