Mumbai Lok Sabha Election : मुंबईत चार जागी तिढा; चित्र अस्पष्ट | पुढारी

Mumbai Lok Sabha Election : मुंबईत चार जागी तिढा; चित्र अस्पष्ट

राजेश सावंत (निवडणूक विशेष )

राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईतील लोकसभा मतदार संघातील महायुती व आघाडीतील अंतर्गत तिढा सुटलेला नाही. उत्तर-पूर्व मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदार संघात महायुती व आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले असले, तरी अन्य चार लोकसभा मतदार संघातील तिढा कायम आहे. या चार मतदार संघातील उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपने उमेदवारी जाहीर केली. मात्र, आघाडीमधील तिढा सुटलेला नाही. उत्तर पश्चिम व दक्षिण मुंबई मतदार संघात आघाडीने उमेदवारी जाहीर केले असले, तरी महायुतीतील तिढा कायम आहे. उत्तर-मध्य मुंबई मतदार संघात तर महायुती व आघाडीमध्ये मतभेद असल्यामुळे अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे मुंबईतील चित्र आजही स्पष्ट झालेले नाही.

दक्षिण मुंबई मतदारसंघ

या मतदार संघात शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील तिढा सुटला असला, तरी महायुतीतील तिढा कायम आहे. या मतदार संघावर भाजप व शिवसेनेने (शिंदे गट) दावा केला आहे. हा मतदारसंघ मनसेला सोडण्यासाठी दोन्ही पक्षात एकमत झाले होते. परंतु, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. पण हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे तो आपल्याला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. परंतु, भाजपचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकर व पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे भाजपचीही चांगलीच पंचायत झाली आहे. भाजपच्या अंतर्गत वादामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यात माजी नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळू शकते.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ

या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी द्यायची नसल्यामुळे भाजप अन्य उमेदवारांच्या शोधात आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे येथून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लढावे, असा आग्रह खुद्द भाजप नेते अमित शहा यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, शेलार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मतदार संघातून कोणता उमेदवार उतरवावा, यावर एकमत झालेले नाही. भाजपचा एक गट पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. काही जण गेल्या काही दिवसापासून काँग्रेस व राजकारणापासून दूर असलेल्या माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षात आणून उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. महाविकास आघाडीतही या मतदार संघात कोणी निवडणूक लढवावी, हे अजून ठरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) येथून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेस व ठाकरे गटांमध्ये वाद आहे. काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे, तर ठाकरे गटही इथून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे.

उत्तर पश्चिम मतदारसंघ

या मतदार संघातून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील आघाडीतील तिढा सुटला आहे. पण महायुतीतील तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही. या मतदार संघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटात आल्यामुळे या मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे. पण ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मुलासाठी गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. येथून उमेदवार उतरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिंडोशी येथे मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान, शिवसेनेने आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. परंतु, ईडी प्रकरणामुळे वायकर यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे. त्यामुळे या मतदार संघातील तिढा आजही कायम आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघ

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापत भाजप नेते केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदार संघातील आघाडीतील तिढा कायम आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, काँग्रेसकडे सक्षम उमेदवारच नाही. त्यामुळे येथून ठाकरे गटाने निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधीलच काही नेत्यांचा आहे. ठाकरे गटानेही तयारी दर्शवली आहे. पण काँग्रेसमधील वरिष्ठ नेते हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ

या मतदार संघात आघाडीने अनिल देसाई, तर महायुतीने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघावर काँग्रेसने दावा केला होता. खुद्द काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड येथून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. परंतु, ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे त्या नाराज होत्या. परंतु, ही नाराजी आता दूर झाली असून, काँग्रेस ठाकरे गटाचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे या मतदार संघात प्रचारही सुरू झाला आहे.

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ

या मतदार संघात महायुती व आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. हा मतदारसंघ आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यामुळे येथून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली. कोटेचा यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये दोन गट पडले होते. पण खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून अंतर्गत मतभेद मिटवला. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

Back to top button