‘अग्निपथ’चा शहरभर निषेध; काँग्रेसची पर्वती, कसबा, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आंदोलने
पुणे : पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ताडीवाला रस्ता परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात भोरचे आमदार संग्राम थोपटे, अरविंद शिंदे, माजी नगरसेविका लता राजगुरू, रफिक शेख, हाजी नदाफ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्वती मतदारसंघाच्या वतीने उत्सव चौकात केलेल्या आंदोलनात अॅड. अभय छाजेड, आबा बागूल, सतीश पवार, रमेश सोनकांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कसबा मतदारसंघाच्या वतीने शनिपार चौकात केलेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वडगाव शेरी मतदारसंघाच्या वतीने पर्णकुटी चौक, येरवडा येथे तर शिवाजीनगरमधील झाशी राणी पुतळा चौकात महिलाध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
"भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तरुणवर्गाचा विश्वासघात केला असून, सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करणार्या तरुणांचा स्वप्नभंग केला आहे. केवळ चार वर्षांची सैन्यदलातील सेवा करून या जवानांना पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा मोदी सरकारचा हा 'तुघलकी' निर्णय आहे."
– संग्राम थोपटे, आमदार, भोर

