

पुणे: पुढारी वृत्तसेवा; राज्यपालांनी आपल्या कार्यपद्धतीत केलेला बदल हा आनंदायीच आहे. सन 1972 ते 90 पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या आहेत. परंतु, कुठल्याही राज्यपालांनी आतापर्यंत मला पुष्पगुच्छ देऊन किंवा पेढा भरविलेला नाही. परंतु, आताच्या घडीला चुकीची शपथ घेत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून पेढा भरविला. एकंदरीत राज्यपालांनी अखेर आपल्या कार्यपद्धतीत बदल केला, हे पाहून आनंद वाटला, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला.
पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीने नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, 'आम्ही शपथ घेतो तेव्हा माझ्यासमोर येणार्या प्रत्येक व्यक्तीला ती कुठल्या एका बाजूची आहे न पाहता निरपेक्षपणे निकाल देईन. परंतु, आताचे राज्यपाल निरपेक्षपणाची जी व्याख्या देशवासीयांसमोर ठेवत आहे, हे आपण निरपेक्षपणे पाहत आहोत,' असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधीची आठवण करून देताना पवार म्हणाले, 'मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून… वगैरे वगैरे ते बोलले, ही शपथ दिली. आमचे सरकार आले, त्या वेळी मी पहिल्या लाइनमध्ये बसलो होतो, आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली, तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र, कालच्या शपथेवेळी हरकत घेतली नाही, याबाबत आश्चर्य वाटते.
राज्यपालांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह
आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करून पाठविला होता. मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते. परंतु, अडीच वर्षे त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे, याची चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे, असेही पवार यांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अध्यक्षपदाचा निर्णय सुप्रीम कोर्टात
उद्या होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक असेल किंवा सभागृहातील बहुमत असेल, यावर बोलताना पवार म्हणाले की, पक्षाने बजावलेला व्हीप पाळावाच लागतो. सध्या एका बाजूला पक्षसंघटना आहे आणि विधिमंडळाची कमिटी एका बाजूला दिसते आहे. त्यामुळे न्यायालयात काय होईल माहीत नाही. तो निर्णय सुप्रीम कोर्टात ठरेल, असे भाष्यही शरद पवार यांनी या वेळी केले
हेही वाचा