

वडगाव शेरी, पुढारी वृत्तसेवा: पालिकेने दिलेल्या परवानगीची मुदत संपल्यानंतरही विमाननगरमध्ये रस्ते खोदाई केली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली आहे. तसेच या नोटिशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे यांनी दिली.
महापालिका आयुक्तांनी तीस मे नंतर खोदाई करता येणार नाही असे स्पष्ट आदेश दिले होते, तरी दि. 5 आणि 6 जूनला विमाननगर, साकोरेनगर ते विमानतळ व्हीआयपी रस्त्यावर महावितरणची केबल टाकण्यासाठी खोदाई केली होती. या खोदाईमुळे रस्त्यावरील पदपथ उखडले आहेत. याबाबतचे वृत्तही दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
एकाच वेळी पन्नास मीटर खोदाई करणे, वाहतुकीला अडथळा करू नये, खोदाईच्या भोवताली सुरक्षा पट्टे लावणे, दिवसा खोदाई करावी, खोदाई करताना वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी अशा विविध नियमांचे पालन करावे लागते. खोदाई करताना पालिकेसाठी दोन डक्ट टाकणे बंधनकारक आहे. खोदाईमधील माती -राडारोडा उचलावा लागतो.
रस्ता क्रॉस करताना 300 मि.मी. व्यासाचे दोन आर.सी.सी. पाईप टाकावे लागतात. यामुळे रस्ता खोदाई करणार्या सर्व कंपन्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी केली होती. याबाबत पालिकेने ठेकेदारांना फक्त नोटीस देण्याची नाममात्र कारवाई केली आहे. पालिकेने ठेकेदारांनी टाकलेली केबल जप्त करावी. तसेच दंडात्मक कारवाई केली पाहिजे. राजकीय दबावामुळे अधिकारी नाममात्र कारवाई करतात.