

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत प्रशासनाने 350 कोटींची वसुली केल्याने जिल्हा परिषदेचे कर वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे. यावर्षी पाचशे कोटींच्या कर वसुलीसाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कर वसुलीला कर्मचार्यांच्या संपाचाही फटका बसला आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 288 कोटींची कर वसुली झाली होती.
संपानंतर उरलेल्या 9 दिवसांच्या कालावधीत 348 कोटींची वसुली झाली. सुटीच्या दिवशीही कर वसुली मोहीम राबविण्यात आली होती. ज्यांची थकबाकी जास्त आहे अशांना नोटीसही देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी 31 मार्चअखेर 350 कोटींची कर वसुली करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. ग्रामपंचायतींकडील थकबाकीची काही प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीत ठेवली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला 31 कोटी 39 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
यावर्षी ग्रामपंचायत विभागाने 500 कोटींच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्नसुद्धा सुरू केले आहेत. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामसेवकांसह सरकारी कर्मचार्यांनी संप केला. त्यामुळे कर वसुली पूर्णपणे थांबली होती. संप मिटताच पुन्हा कर वसुली जोमात सुरू झाली. मात्र, 500 कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ दहा दिवस उरले होते.