…चित्र बदललं अन् गावचा टँकर बंद झाला ; 88 गावे टँकरमुक्त
नरेंद्र साठे :
पुणे : गावात पूर्वीपासून उन्हाळ्यात टँकर सुरू करावा लागत होता. पण, आता चित्र बदललं आहे. जिल्हा परिषदेने टँकरमुक्त अभियान हाती घेतलं आणि त्यामुळं गावात बंधारा, तळे आणि ओढ्याचे खोलीकरण केलं. गावातल्या पाणीपातळीत वाढ झालीच, त्याशिवाय गेल्या वर्षी आणि या वर्षीसुद्धा आतापर्यंत टँकरची गरज भासलेली नाही, असे शिरूर तालुक्यातील केंदूर गावचे सरपंच सूर्यकांत थिटे सांगत होते. ग्रामीण भागात सलग 2000 ते 2020 या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा केलेल्या गावांना टँकरमुक्त करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले. त्यासाठी दर वर्षी टँकरची गरज भासणार्या 103 गावांची निवड केली. या गावांपैकी 88 गावांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. 88 गावे सध्यातरी टँकरपासून मुक्त झाली आहेत, गटविकास अधिकारी स्नेहा देव यांनी सांगितले.
काय केले या गावांमध्ये…?
शासकीय विभाग आणि काही संस्थांनी एकत्र येऊन हे अभियान राबविले. या अभियानामध्ये गावांची गरज ओळखून नियोजनबद्ध कामे केली. त्यामध्ये पाझर तलाव, नदी, ओढ्यांचे खोलीकरण, शोषखड्डा, पाणी पुनर्भरण, बंधारा, पाझर तलाव आणि पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आली.
गावांचे वॉटर बजेट…
निवड केलेल्या गावांचे सर्व विभागांच्या समन्वयाने वॉटर बजेट (पाण्याचे अंदाजपत्रक) तयार करण्यात आले. त्यामध्ये जनावरांना किती पाणी लागेल, पिकांसाठी किती पाणी लागेल आणि नागरिकांसाठी किती पाणी लागेल, याचे नियोजन तयार केले.
मजबुतीकरण
राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून, जिल्हा परिषदेचे स्वतःचे बजेट, 15 वा वित्त आयोग, मनरेगा, जलजीवन मिशन (जेजेएम) आणि जलशक्ती मिशन, जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना, अमृत सरोवर आणि वॉटर कप यांचे एकत्रीकरण करून सुमारे 30 कोटी रुपये पाण्याची ठिकाणे मजबूत करण्यासाठी खर्च करण्यात आले.
टँकरमुक्त अभियानामुळे सध्या तरी 88 गावांना फायदा झाला आहे. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, आम्ही सध्या स्वच्छ भारत मिशन आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत वातावरणातील बदलांवर आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले आहे.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

