

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, एकूण 67 मतदान केंद्र निश्चित केली आहेत.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनेल तसेच अपक्ष उमेदवारांसह एकूण 90 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीचा पॅनेल व इतर अपक्ष, अशी लढत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ’ब’ वर्ग गटातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी आहे. (Latest Pune News)
या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, 67 मतदान केंद्र निश्चित केले आहेत. यामध्ये गट नंबर 1 माळेगावसाठी 11 मतदान केंद्र, गट नंबर 2 पणदरेसाठी 13 मतदान केंद्र, गट नंबर 3 सांगवी-कांबळेश्वरसाठी 8 मतदान केंद्र, गट नंबर 4 खांडज-शिरवलीसाठी 7 मतदान केंद्र, गट नंबर 5 निरावागजसाठी 12 मतदान केंद्र, गट नंबर 6 बारामतीसाठी 15 मतदान केंद्र निश्चित केली आहेत. ’ब’ वर्गसाठी 1, अशा एकूण 67 मतदान केंद्रांवर मतदान करण्यात येईल. दरम्यान, पोलिस प्रशासनाने देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.