झेब्रा शोधमोहीम आता सातासमुद्रापार, कात्रज प्राणिसंग्रहालय : आंतरराष्ट्रीय कंपनीला देणार टेंडर

झेब्रा शोधमोहीम आता सातासमुद्रापार, कात्रज प्राणिसंग्रहालय : आंतरराष्ट्रीय कंपनीला देणार टेंडर

पुणे; पुढारी प्रतिनिधी : गेल्या वर्षी झालेल्या नियोजनानुसार यंदाच्या नव्या वर्षात राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पुणेकरांना झेब्रा पाहायला मिळणार आहे. त्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली असून, झेब्रा आणण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता एका आंतरराष्ट्रीय कंपनीने अर्ज केला आहे अन् त्याच कंपनीला झेब्रा आणण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिनाभरातच पुण्यात झेब्रा आणण्यासाठी आफ्रिकन देशांमध्ये शोधमोहीम सुरू होणार आहे.

झेब्रा हा प्राणी मूळतः आफ्रिकन देशांमध्ये असतो. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातदेखील झेब्रा परदेशातूनच आणावा लागणार आहे. त्याकरिता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सेंट्रल झू ऑथॉरिटी) सुचविलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीला हे काम देण्याचे नियोजन प्रशासन पातळीवर सुरू आहे. सध्या या कंपनीचे नाव समोर आले नसले, तरी याच कंपनीला हे काम देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

झेब्रा खंदकाचे काम पूर्ण
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात झेब्रा आणल्यानंतर त्याच्या राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक असणार आहे. त्याकरिता गेली वर्षभर प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून झेब्रा खंदक उभारण्याचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले असून, यातील काही किरकोळ कामे सध्या सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी अटी-शर्ती बदलणार
झेब्रा आणण्याच्या निविदा प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेकडून काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. या अटी-शर्तींची या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून पूर्तता होत नाही. त्यामुळे या प्रक्रियेतील अटी-शर्ती बदलण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात येणार आहे. सध्या या निविदा प्रक्रियेसाठी एकच अर्ज आला होता. तोच आता मंजूर करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याकरता अटी-शर्तीमध्ये बदल केले जाणार आहेत.

पुण्यात झेब्रा आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झेब्रा आणण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, एका आंतरराष्ट्रीय कंपनीला झेब्रा आणण्याचे काम देण्याचे नियोजन आहे.
                                                    – अशोक घोरपडे,
                                        मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग, पुणे मनपा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news