पुणे: लक्षवेधी लढतीत झगडेवाडीत पुन्हा राष्ट्रवादी, बहुमताने मिळवली एकहाती सत्ता; सरपंचपदी झगडे यांची निवड

पुणे: लक्षवेधी लढतीत झगडेवाडीत पुन्हा राष्ट्रवादी, बहुमताने मिळवली एकहाती सत्ता; सरपंचपदी झगडे यांची निवड

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी ग्रामपंचायतीच्या लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली सत्ता राखण्यात पुन्हा यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल गौतम झगडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. झगडेवाडीच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा अतुल झगडे यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या हाती गावचा कारभार सोपवला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये अतुल झगडे यांच्या पत्नी रुपाली झगडे यांनी बिनविरोध निवडून येत गावगाडा हाकला आहे.

झगडेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे हे सरपंचपदासाठी मैदानात होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसची असणारी सत्ता खेचून घेण्यासाठी भाजप गटाकडून निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र, या ठिकाणी पुन्हा भाजपला अपयश आले आहे.

या निकालात सरपंचपदी अतुल गौतम झगडे जनतेतून विजयी झाले आहेत, तर सदस्यपदी पूनम नागेश अभंग, सचिन रतन अभंग आणि संगीता तुळशीराम बारवकर हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. लढतीमधून दादाराम जालिंदर झगडे, छाया सुनील झगडे आणि मोनाली दीपक झगडे हे सदस्यपदी विजयी झाले.

भाजप पुरस्कृत शिवशंभू पॅनेलचे धनाजी भीमराव मोरे हे एकमेव सदस्य विजयी झाले आहेत. मागील पंचवार्षिक सत्तेच्या काळात गावासाठी जवळपास साडेसोळा कोटींचा विकासनिधी अतुल झगडे यांनी गावात खेचून आणला. यातून रस्ते, जलजीवन मिशन योजना प्रगतिपथावर आहे आणि राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली आहे. यासह 33/11 के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. या व्यतिरिक्त गावात अनेक सुख-सुविधा राबविण्यात आल्या.

याच कामाची पावती म्हणून जनतेने माझ्यावर मतदानरूपी आशीर्वादाची उधळण केली. हा विजय माझा एकट्याचा नसून, अवघ्या गावाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे जे काही प्रश्न असतील, ते मार्गी लावण्यासाठी पूर्ण कायम प्रयत्नशील असेल, असा विश्वास नूतन सरपंच अतुल झगडे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news