

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बारामतीतील युवानेते आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी त्यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात यापुढे कधीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले असून, त्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते संभ—मात पडले आहेत. विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, अशी लढाई बारामतीत झाली होती. विधानसभेनंतर लागलीच युगेंद्र पवार यांनी आता तलवार म्यान केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना युगेंद्र पवार यांचे विधान अधिकच गोंधळात टाकणारे ठरले आहे
राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुरुवातीला शरदचंद्र पवार गटाकडे बारामतीत पदाधिकारी- कार्यकर्ते फारसे नव्हते. हळूहळू वातावरण बदलत गेले. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या काहींना या गटाचा पर्याय उपलब्ध झाला. पुढे कार्यकर्त्यांची संख्या वाढली. पदाधिकारी-कार्यकर्त्यांना बारामतीत सक्षम पर्याय दिसू लागला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे विजयी झाल्याने पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार यांच्याविरोधात पुतणे युगेंद्र यांनीच मैदानात उडी घेतली. यानिमित्ताने बारामती विधानसभेला पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. यात अजित पवार यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला. परंतु अजित पवार यांच्या आजवरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात असणार्या उमेदवारांपेक्षा युगेंद्र पवार यांनी जादाची मते मिळवली, हे उल्लेखनीय आहे.