दुर्दैवी ! पालिकेच्या हलगर्जीमुळे तरुणाचा बळी; झाडाची फांदी ठरली काळ

दुर्दैवी ! पालिकेच्या हलगर्जीमुळे तरुणाचा बळी; झाडाची फांदी ठरली काळ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका 32 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. ओंकारेश्वर मंदिराजवळील उंबराच्या झाडाची वाळलेली धोकादायक फांदी काढण्याबाबत तक्रार करूनही उद्यान विभाग आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने कार्यवाही केली नाही. दुर्दैवाने हीच फांदी कोसळून टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या अभिजित गुंड या तरुणाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली.

शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ चहाच्या टपर्‍या आहेत. कसबा पेठेत राहणारा अभिजित रविवारी सायंकाळी मित्रांसोबत टपरीवर चहा पिण्यासाठी आला होता. त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. अचानक याठिकाणी असलेल्या झाडाची फांदी अभिजितच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या अभिजितला नागरिकांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. धक्कादायक म्हणजे अभिजितच्या डोक्यावर ज्या झाडाची फांदी कोसळली, त्या धोकादायक झाडाबद्दल आणि फांदीबद्दल गणेश पाचरकर या नागरिकाने जुलै महिन्याच्या अखेरीस महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार केली होती. यासंदर्भात विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळ झाडाची फांदी पडून एका दिव्यांग महिलेचा मृत्यू झाला होता.

अभिजित बँकेत रोखपाल होता

अभिजित हा एका खासगी बँकेत रोखपाल आहे. त्याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याचा एक भाऊ परदेशात वास्तव्यास आहे. अभिजित अविवाहित होता. त्याच्या मृत्यूची माहिती भावाला कळविण्यात आली असून, सोमवारी शोकाकुल वातावरणात अभिजित याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी दिली.

तरुणाच्या मृत्यूला जबाबदार महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आणि उद्यान विभागाचे अधिकारी दोषी आहेत. यासंदर्भात मी वारंवार पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार व गणेश पाचरकर यांनी ऑनलाइन तक्रार करून देखील ढिम्म प्रशासनाने कार्यवाही केली नाही. याबाबत संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

– गणेश भोकरे, अध्यक्ष, मनसे कसबा विधानसभा.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news