

पुणे: व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका टोळक्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने खूनी हल्ला केला. प्रथमेश चिंटू आढळ (वय 19, रा. कोंढवे धावडे) असे जखमी तरुणाचे नाव असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना गुरुवारी (दि.11) रात्री आठच्या सुमारास आर. आर. वाईन्स उत्तमनगर परिसरात घडली. या वेळी टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह सुरेंद्रसिंह गचंड (वय 20, रा. आरती निवास, उत्तमगर) याला अटक केली असून, त्याच्या तिघा अल्पवयीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
फिर्यादी तरुण हा बारावी उत्तीर्ण असून, पोलिस भरतीची तयारी करतो. तो आरोपी करणसिंह आणि इतरांना ओळखतो. त्यातील काही पोरांना व्यसनाचा नाद असल्यामुळे आढळ त्यांना भेटण्याचे टाळत होता. आरोपीपैकी एकाने आढळ याला फोन करून तू आमच्यात येत नाहीस, आपल्यात काही गैरसमज झाले असून, ते आपापसांत मिटवून घेऊ, असे म्हणून आर. आर. वाईन्स येथे भेटायला बोलवले होते.
त्यानुसार आढळ हा आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपींनी आढळ याला तू आता मोठा झाला, आमच्यात उठ-बस तुझी होत नाही, असे म्हणून लाथा-बुक्यांने मारहाण करून डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. तसेच आढळ याच्या दोन्ही हातावर वार केले.
आरोपींनी शस्त्र हवेत फिरवून आम्ही येथील भाई असून, आमच्या नादी कोणी लागले तर त्याला सोडणार नाही. असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. आढळ याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.