

Maharashtra politics
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी नाही. आम्ही तिघे एकत्रित बसतो तेव्हा असे कधी जाणवले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही चांगले काम करतात.
राज्यात चांगला करभार व्हावा असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. त्यामुळे नाराजी नाही, असे मी स्टॅम्पवर लिहून देऊ का ? आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील नाराजीच्या चर्चेवर पडदा टाकला. (Latest Pune News)
हडपसर येथे शनिवारी (दि. 13) पवार यांच्या पुढाकारातून ’जनसंवाद’ अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
महिला आयपीएस अधिकारी प्रकरणावर ‘नो कमेंट्स’
महिला आयपीएस अधिकारी प्रकरणावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर बोलण्याचे टाळले. त्यांनी या प्रश्नावर नो कमेंट्स म्हटले. यानंतर देखील काही पत्रकारांनी त्यांना पुन्हा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, मी माझी भूमिका मांडली आहे.
फेसबुकवर आणि ट्विटरवर मी स्पष्टीकरण दिलं आहे. मी आता त्यावर बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं आहे ते दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे. जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडली आहे, असे पवार म्हणाले.