पुणे : रस्त्यावरून जात असताना तरुण दुचाकीला आडवा आल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याचा बहाणा करत दोन हजारांची मागणी केली. तसेच त्याला तळजाई परिसरात नेऊन त्याचा खून करणार्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे (वय 21, रा. 866 रविवार पेठ) व अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे (वय 22, रा. स. नं. 65, तळजाई वसाहत, पद्मावती) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी निकालात नमूद केले आहे.
ही घटना 18 मार्च 2017 रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. रामअवतार बनवारीलाल जाटव (वय 19) असे मयत युवकाचे नाव आहे. मुळचा मध्यप्रदेशचा असलेला जाटक पुण्यात बांधकाम साईटवर फरशी बसविण्याचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या मोटार सायकवरून मार्केट यार्ड येथे जात होते. या वेळी रामअवतार हा रस्त्यात आडवा आल्याने दोन्ही आरोपी रस्त्यावर खाली पडले. याबाबत त्यांनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. यादरम्यान, त्यांनी त्यास मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून वनशिव वस्ती येथील मोकळ्या जागेत नेत त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधत रामअवतार याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत करत रामअवतार याचा दोरीने गळा आवळला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करून पळून गेले होते.
या प्रकरणी, पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी 40 साक्षीदार तपासले. आरोपींनी अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा गुन्हा केला आहे. त्यांनी अवघ्या दोन हजार रुपयांसाठी क्रुरपणे तरुणाची हत्या केली आहे. त्यांच्याकडून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यामुळे, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अॅड. कोळी यांनी केली. युक्तिवादादरम्यान, त्यांनी व्हॉईस सॅम्पल, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे कोर्टापुढे सादर केले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली. सरकार पक्षास न्यायालयीन कामकाजास हवालदार गणेश तेळकर यांनी सहकार्य केले.