

टाकळी भीमा: पुणे जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पूर आला. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे कामिनी ओढ्यात दुचाकी अडकल्याने दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी गेलेला युवक पुराच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना दि. 15 सप्टेंबर रोजी घडली. सुरज अशोक राजगुरू (वय 30, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) असे या युवकाचे नाव असून, गेल्या दोन दिवसांपासून आपदामित्र व अग्निशमन दलाचे पथक त्याचा शोध घेत आहेत. (Latest Pune News)
एक दुचाकी ओढ्यात अडकली होती. त्या वेळी सुरज राजगुरू हा त्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी ओढ्यात उतरला. मात्र, पाण्याचा जोर वाढल्याने तोल जाऊन तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, संदीप कारंडे यांच्यासह आपदामित्र वैभव निकाळजे, महेश साबळे पाटील, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, राहुल गायकवाड तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशमन दलाचे उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, उमेश फडके, शुभम पोटे, सिद्धांत जाधव, विकास आडे, राजेश फुंदे, दिग्विजय नलावडे यांच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली.
ग्रामपंचायत अधिकारी गुलाब नवले, तलाठी आबासाहेब रुके, माजी सरपंच रावसाहेब करपे, पोलिस पाटील किरण काळे यांच्याही उपस्थितीत शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत कोणताही मागमूस लागला नाही. दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. पण, दुपारपर्यंतही सुरजचा शोध लागला नाही. पथकाचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिस हवालदार अमोल चव्हाण यांनी दिली.