

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर-वडज मार्गावरील तलाखी येथील सुमारे 60 फूट खोल विहिरीत एका युवकाला जलसमाधी मिळाली. या रस्त्यालगत असलेल्या व संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत चारचाकीसह पडल्यामुळे पारुंडे (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र रघुनाथ पवार (वय 48) यांचे अपघाती निधन झाले.
पवार हे रविवारी (दि. 6) रात्री उशिरापासून नॉट रिचेबल झाले होते. लायन्स क्लबचे सचिव असलेल्या पवार यांनी दिवसभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मात्र, रात्री 12 वाजेपासून त्यांचा संपर्क तुटल्यामुळे शोधाशोध सुरू होती. उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव व त्यांच्या टीमने विविध सीसीटीव्ही तपासत शोध मोहीम राबविली.
मात्र, तपास लागत नव्हता. मंगळवारी (दि. 8) सकाळी तलाखी (कुसूर) येथील रस्त्यालगतच्या विहिरीजवळ गाडीचे अवशेष तसेच विहिरीतील झाडावर धडकेचे निशाण आढळल्यामुळे येथे शोधकार्य सुरू झाले. मात्र, विहीर खोल असल्यामुळे स्थानिक रेस्क्यू पथकाला अडथळे येत होते. त्यानंतर पुण्याहून आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या पाणबुडी पथकाने अपघातग्रस्त चारचाकी वाहन (एमएच 14 ईयू 4554) व मृतदेह बाहेर काढला.
या वेळी पाणबुडी पथकातील ऋषिकेश शिवतारे, निखिल शिवतारे तसेच स्थानिक प्रशांत शिंदे, राजकुमार चव्हाण, तेजस शिंदे, रूपेश जगताप व गावकर्यांनी मदतकार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.