

खोर: एकेकाळी ग्रामीण भागाचा मुख्य आधार असलेला शेतीव्यवसाय आज तरुणाईपासून दुरावलेला दिसत आहे. दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तरुण पिढी शेती करण्याऐवजी उच्च शिक्षण घेऊन शहरात नोकरी मिळवणे किंवा परदेशात स्थायिक होणे पसंत करत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला शेतीव्यवसाय आता आकर्षण हरवत असल्याचे स्पष्ट चित्र उभे राहिले आहे.
हवामानातील अनिश्चितता, पावसाचे लहरी स्वरूप, अतिपाऊस वा दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बाजारात पिकांना योग्य भाव न मिळाल्याने कधी कधी शेतमाल टाकून देणे विक्रीपेक्षा स्वस्त पडते. (Latest Pune News)
परिणामी शेतीला धंदा म्हणून गंभीरतेने घेण्यास तरुण तयार नसतात. त्यामुळे उच्चशिक्षण घेतलेले युवक शहरातील नोकरी, व्यवसाय किंवा परदेशातील संधींचा शोध घेत आहेत. स्थिर उत्पन्नाची हमी आणि सामाजिक प्रतिष्ठा या कारणांमुळे शेतीपेक्षा इतर क्षेत्रांचा मोह वाढलेला आहे.
बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा नफा नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा वाढतो आहे. यंत्रसामग्री, ड्रिप, स्प्रिंकलर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काही शेतकरी करत असले तरी सर्वांना ते परवडत नाही.
त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीची संधी मर्यादित वाटते. तरुणांना शेतीत आकर्षित करण्यासाठी सरकारकडून योजना जाहीर केल्या जात असल्या तरी त्यांचा लाभ प्रत्यक्षात किती तरुणांपर्यंत पोहोचतो हा मोठा प्रश्न आहे.
एकंदरीत, पुढील पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी स्थिर बाजारपेठ, पिकांना हमीभाव, हवामान बदलाशी लढण्यासाठी उपाययोजना व तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी सहज वापर यांची गरज आहे. अन्यथा भविष्यात शेती पडीक राहण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात.
जमिनी विक्रीची प्रवृत्ती
औद्योगिकरणामुळे शेतजमिनी विकल्या जात आहेत. तात्पुरता पैसा मिळवण्यासाठी जमिनींची विक्री होत असल्याने पुढच्या पिढीकडे शेती टिकत नाही.
आकडेवारीचे वास्तव
महाराष्ट्रात 55 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
मात्र 2024 च्या कृषी जनगणनेनुसार 18 ते 35 वयोगटातील केवळ 11 टक्के युवक प्रत्यक्ष शेतीत सक्रिय आहेत.
मागील 10 वर्षांत तरुण शेतकऱ्यांची संख्या 15 टक्क्यांनी घटली आहे.
पुणे जिल्ह्यातील सुमारे 65 टक्के शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणानंतर शेतीऐवजी औद्योगिक, आयटी किंवा परदेशी नोकरीकडे वळतात.
दरवर्षी सरासरी 40 हजारांहून अधिक तरुण शेतीव्यवसाय सोडून इतर क्षेत्रात प्रवेश करतात.