निमोणे: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागाला ‘बाजरीचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. यंदा सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी आशेने खरीप पिकांची पेरणी केलीहोती. बाजरीच्या शेतात संपूर्ण कुटुंबाने राबून पीक उभे केले. परंतु, मागील आठवडाभर परतीच्या पावसाने सर्व चित्र पालटून टाकले.
पिके हाती येण्याच्या वेळेस पावसाने झोडपल्याने जवळपास 80 टक्क्यांहून अधिक बाजरीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभे पीक भुईसपाट झाले. मजुरांच्या मदतीने काढणी सुरू असतानाच पाऊस आला आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कष्टाची सालचंदी मातीमोल झाली. (Latest Pune News)
याचबरोबर कांद्याच्या चाळी ओलसर हवामानामुळे सडू लागल्या आहेत. मूग, मका, फळबागा या पिकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. चासकमान कालव्यामुळे या परिसरातील शेतकरी ऊसशेतीकडे वळले. मात्र, सध्या बहुतेक कारखाने बंद असल्याने उसाला बाजारपेठ उपलब्ध नाही.
परिणामी, शेतकरी गुऱ्हाळे किंवा रसवंतिगृहांकडे उसाची विक्री करीत आहेत. परंतु, पावसामुळे शेतात तळे साचून तोडलेला ऊस तिथेच पडून आहे.अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे. पावसाने झोडपलेला शेतकरी न्यायासाठी सरकारकडेच डोळे लावून बसला आहे.
पावसाने बाजरी भुईसपाट
धामणी (ता. आंबेगाव) परिसरातील बाजरीचे पीक गेले पाच-सहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भुईसपाट झाले. काढणीला आलेली बाजरी पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी धामणीच्या माजी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, ग््राामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, गणेश भूमकर यांनी केली आहे. सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.