Pune Crime News: दुचाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अल्पवयीनांनी तरुणावर तब्बल 35 वार केले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
अभय मारुती सूर्यवंशी (वय 20, रा. गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अभय याच्या आईने फिर्याद दिली आहे. खून करणारे युवक अल्पवयीन आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय हा एका मिठाई विक्री दुकानात काम करतो. अल्पवयीन युवक आणि अभय एकाच भागात राहायला आहेत. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गणेशनगर कॉलनीतील घरासमोर अभय थांबला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले.
अल्पवयीनांनी त्याच्यावर एकापाठोपाठ तब्बल 35 वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट पसरली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेला एक साथीदार शहरातून पसार झाला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.