Pune Weather News: बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'दाना' हे चक्रीवादळ शमताच अवघ्या बारा तासांत वातावरणात मोठे बदल झाले. त्यामुळे मुसळधार पावसाचे अलर्ट क्षीण झाले अन् थंडीची चाहूल लागली. त्यामुळे सोमवार ते बुधवार दरम्यान दिवाळीत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेले दोन दिवस हवामान विभाग राज्यातील पाऊस वाढणार असल्याचा अंदाज देत होता. त्यात रविवार ते सोमवार या कालावधीत संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट शुक्रवारी जारी करण्यात आला होता. यात राज्यातील 21 जिल्ह्यांचा समावेश होता.
मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'दाना' हे चक्रीवादळ शमताच पावसाचे अलर्ट क्षीण झाले अन् थंडीची चाहूल सुरू झाली. सायंकाळी सात ते सकाळी सात या बारा तासांतील किमान तापमानात सरासरी 5 ते 6 अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा तडाखा अन् रात्री थंडी असे वातावरण राहील असा अंदाज आहे.