पौड : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून मुळशी तालुक्यातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकरिता मुळशी धरणातील पाणी हे मुळशीतील 24 गावे, हिंजवडी परिसरातील 13 गावे आणि कोळवणमधील 11 गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी सातत्याने संबंधित खात्याकडे करण्यात आली. एक टीएमसी पाणी दिले, तर जवळपास 50 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मुळशी धरण भागात आजही अनेक समस्या आहेत. या सोडविण्यासाठी उच्च न्यायलयात याचिका दाखल असून, त्याची सुनावणी मार्च महिन्यात आहे.
जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचे नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी सांगितले.
मुळशी धरणाची उंची वाढवून मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा 1 व 2 मधील सर्व कामांना गती द्या, तसेच मुळशीतील 50 गावांना पुढील 30 वर्षांचा विचार करून पाणी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. यासाठी प्रयत्नशील असलेले व मुळशीच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले अमित कंधारे दै. 'पुढारी'शी बोलत होते.
हिंजवडीसह कोळवण खोर्यातील गावांमध्ये येत्या तीन वर्षात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात यावी. उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणार्या जमिनीपैकी 80 टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील असून, ती विनामोबदला देण्याची विनंती करण्यात यावी. उर्वरित 20 टक्के जमीन शासनाच्या वतीने अधिग्रहण करावी. यासाठी जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावा, असे निर्देश झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हे निर्णय योग्य असले तरी न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असल्याचे कंधारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा