

पुणे: येरवडा कारागृहातील बराकीत झालेल्या वादातून दोन कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला केला होता. मात्र शुक्रवारी (दि.19) दुपारी सव्वाएक वाजता त्या कैद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. विशाल नागनाथ कांबळे (वय 28, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.
याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय 30, रा. जय जवाननगर, येरवडा), दीपक संजय रेड्डी (वय 27, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता, परंतु आता यात कलम वाढवून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कारागृह अधिकारी सचिन गुरव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारहाणीची ही घटना 15 डिसेंबरला सकाळी पावणेसातच्या सुमारास येरवडा कारागृहात घडली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी, कांबळे हे गुन्हेगार आहेत. येरवडा भागातील एका खून प्रकरणात चंडालियाला अटक केली होती. येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक 1 मध्ये तिघांना ठेवले आहे. चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात कारागृहात वाद झाले होते. सोमवारी (15 डिसेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास चंडालिया, रेड्डी यांनी कांबळेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी चंडालिया आणि रेड्डी यांना रोखले. जखमी अवस्थेतील कांबळे याला तातडीने ससून रग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून कांबळेवर उपचार सुरू होते. त्याची प्रकृती गंभीर होती.
शुक्रवारी दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास कांबळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टांनी सांगितले, अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली होती. कांबळेच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या नातेवाइकांनी ससून रुग्णालय परिसरात गर्दी केली. त्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शवविच्छेदन करून कांबळेचा मृतदेह पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
येरवडा कारागृहात कांबळेवर इतर दोघांनी फरशीच्या तुकड्याने हल्ला केला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी दुपारी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी आता खुनाचे कलम वाढवले आहे.
अंजुमन बागवान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक