

यवत / खुटबाव : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीतील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना २६ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. विटंबना करणारा आरोपी तेव्हापासून फरारी झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार करून आरोपीचा शोध घेत होते. (Pune News Update)
मात्र आरोपी हा यवत गावच्या हद्दीत त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतात लपून बसला होता. आरोपी अमित पापा सय्यद (वय ३२ वर्षे रा. यवत, ता. दौंड) याला यवत पोलिसांनी बुधवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी गुरुवारी यवत पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.
गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित सय्यद हा निळकंठेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका गावठी दारूच्या अड्ड्यावर दारू पिऊन तो निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या बाकड्यावर झोपला होता. त्यानंतर आरोपीने दारूच्या नशेत मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड करून तो फरारी झाला होता. मात्र आरोपीचा मोबाईल आणि चप्पल घटनास्थळी राहिली होती. आरोपी पुन्हा सकाळी रेड्डी कावरा गुडावत याच्या दारूच्या अड्ड्यावर आला असता गुडावत याने आरोपीची माहिती पोलिसांना न देता आरोपीला पळून जाण्यास सांगितल्यामुळे यवत पोलिसांनी रेड्डी कावरा गुडावत याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यालाही अटक केली आहे. आरोपी अमित सय्यद हा तो राहत असलेल्या घराच्या पाठीमागील ऊसाच्या शेतात ऊस खाऊन आणि ओढ्याचे पाणी पिऊन लपून बसला होता. बुधवारी रात्री ऊसाच्या बाहेर आला असता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी सकल हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वतीने दौंड तालुका बंदची हाक देण्यात आली असून बहुतेक गावांत बंद पाळण्यात आला आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यवत पोलिसांनी गावातून पथसंचलन केले असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.