

खुटबाव : दौंड तालुक्यातील यवत येथे एका तरुणाने सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवार (दि.१ ऑगस्ट) दुपारपासून जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पुन्हा मंगळवार आणि बुधवारी ५ तास अंशतः शिथील केले होते. मात्र गावात शांतता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ६) रात्री १२ वाजेपासून लागू करण्यात आलेली जमावबंदी हटवल्याने यवतचे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले असून छोट्या-मोठया व्यावसायिकांसह व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Pune Latest News)
यवत रेल्वे स्टेशन जवळील निळकंठेश्वर मंदिर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची दि. २६ जुलै रोजी एका माथेफिरू तरुणाने तोडफोड करून विटंबना केली होती. आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली होती. यवत गावात तणावपूर्ण शांतता असतानाच दि. १ ऑगस्ट रोजी एका तरुणाने सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्यामुळे समाज आक्रमक होऊन प्रार्थना स्थळांची तसेच गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळींच्या घटना घडली होती.
प्रतिबंधात्मक आदेश म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केले होते. जमावबंदी आदेश लागू केल्यापासून गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे तशाप्रकारचा प्रस्ताव सादर केला. यानंतर तहसीलदार शेलार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याने डुडी यांनी जमावबंदीचे आदेश बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून हटवल्याचा आदेश काढला. सहा दिवसांनंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्व पदावर येत असल्यामुळे छोट्या-मोठया व्यावसायिकांसह व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली असून दैनंदिन जीवन सुरू झाले आहे. पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे.