Yavat Violence: मशिदींची तोडफोड, जाळपोळ करणाऱ्यांची यवत पोलिसांकडून धरपकड सुरू; अनेक जण ताब्यात
Yavat Police Arrest Mosque Vandalism Suspects
यवत: शुक्रवारी (दि. १) सकाळी यवतमधील एका मुस्लिम व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर यवतमध्ये मोठ्या प्रमाणात युवक जमून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या सय्यद याच्या घरावर दगडफेक करत आग लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर युवकांनी त्यांचा मोर्चा सहकारनगर, इंदिरानगर, स्टेशन रस्ता येथील मशिदीवर नेला.
त्या ठिकाणी त्या मशिदीची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली, तसेच तणावपूर्ण परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदी आदेश लागू केला.
यवत पोलिसांनी या घटनेतील संशयितांची शुक्रवारी रात्री धरपकड सुरू केली आहे. रात्रीत अनेकजण ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून अनेकजण फरार आल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी यांच्या जमाबबंदी आदेशमुळे यवतची बाजारपेठ शनिवारी देखील बंद पाहायला मिळाली.
नेमका काय प्रकार घडला?
यवतमधील एका तरुणाने एका पुजाऱ्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असलेले स्टेटस आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले होते. ही पोस्ट मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित असली तरी, स्थानिक पातळीवर त्यातून मोठा गैरसमज निर्माण झाला आणि अफवा पसरली. यानंतर दोन्ही समाजातील नागरिक एकत्र जमले, ज्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

