पुणे: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीनविक्रीस विरोध असून, साखर आयुक्तालयाने त्यासाठी ना हरकत दाखला देऊ नये, अशी महत्त्वपूर्ण मागणी यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
यशवंत कारखान्याच्या सभासदांना विश्वासात न घेता जमीनविक्रीची मनमानी प्रक्रिया चालू आहे. आमचा या प्रक्रियेस तीव्र विरोध असून, त्यांच्या गैरकारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. साखर आयुक्तालयात सोमवारी (दि. 4) दुपारी लवांडे यांच्यासह पांडुरंग काळे, लोकेश कानकाटे, सागर गोते, अलंकार कांचन, राजेंद्र चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेतली.
तसेच कारखान्याची सद्य:स्थिती आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रत निवेदनाबरोबर देऊन सविस्तर चर्चा केली. त्या वेळी ही मागणी केली असता निवेदनावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन साखर आयुक्त सालीमठ यांनी शिष्टमंडळास दिले.
निवेदनात म्हटले आहे की, यशंवत कारखान्याप्रश्नी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व 2011 पासूनच्या कारखान्यावरील प्रशासकांनी अतिशय बेजाबदारपणा दाखवून कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यकसुरी केलेली आहे.
कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबत कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीस त्या त्या काळातील कर्तव्य कसुरी करणारे प्रशासक, अवसायक व विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी. कारखान्याचे वेळोवेळी सन 2011-12 पासून झालेले शासकीय लेखापरीक्षण संशयास्पद व बनावट वाटत असून, त्याची शास्त्रशुद्ध पडताळणी तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी.
कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने सुमारे 100 एकर जमीन बेकायदा ठराव करून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला थेट विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, जाहीर टेंडर लिलाव प्रक्रिया न करता संस्थेचे कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसान होणार आहे. याबाबत सर्व बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची व साखर आयुक्तांची परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यशवंत कारखान्याची मुख्य रस्त्यालगत गट नंबर 2 मध्ये सुमारे 70 ते 80 एकर जमीन आहे. या ठिकाणी कारखान्यास ऊस घालण्यास येणारे ट्रक, टेम्पो, बैलगाड्या, ट्रॅक्टरट्रॉली आदी वाहने मोठ्या संख्येने उभी राहतात. त्यांच्या मुक्कामाची सोयसुद्धा येथे होते. जमीन विक्री करण्यास आमचा विरोध असून, कारखाना सुरू झाल्यानंतर या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या जमिनीचाच उपयोग होणार असून, ती गरजेची आहे; अन्यथ वाहतूक कोंडीची मोठी समस्या भविष्यात आणखी वाढण्याचा धोका आहे.
-पांडुरंग काळे, यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती